काय सांगता ! होय, पत्नीच्या खूनप्रकरणी जामिनावर आमदार बाहेर, अमनमणि त्रिपाठींनी केलं दुसरं लग्न

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पहिल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप असलेले उत्तरप्रदेशातील नौतनवांमधील अपक्ष आमदार अमनमणि त्रिपाठी यांनी ३० जूनला दुसरे लग्न केले आहे. आमदार अमनमणि सध्या जामिनावर बाहेर असून, त्यांच्या लग्नाची बातमी कळताच सर्वांनाच धक्का बसला आहे. ओशिन पांडे सोबत अमनमणि यांचे लग्न झाले आहे. अमनमणि मधुमती शुक्ला खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेले माजी मंत्री अमरमणि त्रिपाठी यांचा मुलगा आहे. कोरोना संसर्गामुळे अमनमणि यांचा दुसरा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. मात्र त्यांचे पहिले लग्न देखील मोठ्या वादात होते. पाच वर्षांपूर्वी त्यांची पहिली पत्नी सारा सिंग यांचे निधन झाले होते. सारा आणि अमनमणि एकत्र प्रवास करत असताना एक अपघात झाला होता. या अपघातामध्ये साराचा मृत्यू झाला होता. परंतु, अमनमणि यांना कोठेही दुखापत झाली नव्हती. घडलेल्या या घटनेनंतर अमनमणि यांच्यावर साराच्या हत्येचा आरोप करण्यात आला.

अमनमणिच्या विवाह मिरवणुकीत त्यांची बहीण तनुश्री मणि त्रिपाठी आणि अलंकृता त्रिपाठी सुद्धा सहभागी झाल्या होत्या. दुपारच्या सुमारास रॉयल ऑर्किड पॅलेस येथे मिरवणूक आली. येथे लग्नाचे सर्व विधी करण्यात आले आणि नंतर संध्याकाळी रिसेप्शन घेण्यात आले. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती काही मोजक्या खास पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. अमनमणि यांचे लग्न ओशिन पांडे यांच्याशी झाले आहे. ओशिन या मध्यप्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. तिने नोएडाच्या सिम्बोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. ती सर्वोच्च न्यायालयात वकिली करते. ती दुचाकीस्वार आहे.

कवियित्री मधुमिता शुक्ला यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे नौतनवांचे अपक्ष आमदार अमरमणि त्रिपाठी हे माजी मंत्री आणि आमदार अमनमणि त्रिपाठी हे त्यांचे पुत्र आहेत. अमरमणि यांचे घर गोरखपूरमधील दुर्गाबाड़ी रोडवर आहे. ते नौतनवांचे अपक्ष आमदार आहेत. अमनमणि यांचे वडील अमरमणि आणि आई मधुमनी त्रिपाठी तुरुंगात बंद आहेत. त्यांना या लग्नाला उपस्थित राहता आले नाही, म्हणून लग्नाची सर्व तयारी अमनमणि यांच्या बहिणींनी केली होती. काका अजितमणी त्रिपाठी आणि काकू मधुबाला यांनी आई – वडिलांचे सर्व विधी लग्नात पार पाडले. कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध अमनमणि यांचे जुलै २०१३ मध्ये साराशी लग्न झाले होते. या दोघांचे लग्न लखनऊच्या अलिगंजमधील आर्यसमाज मंदिरात झाले. मुलाच्या लग्नामुळे नाराज असलेल्या अमरमणि यांनी वर्षानंतर त्यांचे लग्न स्वीकारले. ९ जुलै २०१५ रोजी सारा सिंगचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी अमनमणिच्या विरोधात पत्नीच्या हत्येचा खटला सीबीआयकडे सुरु आहे. उत्तर प्रदेशने ऑक्टोबर २०१५ मध्ये साराची आई सीमा सिंह यांच्या अर्जावर सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. याचा तपास सध्या सुरू आहे.