‘या’ बड्या कंपनीतील शेकडो कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, फॅक्टरी बंद करण्याची मागणी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन प्रक्रिया शिथिल केल्यानंतर बजाजने औरंगाबादचा कारखाना सुरू केला आहे. मात्र, प्लांटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह जवळपास 250 प्रकरणे आढळून आली, अशी माहिती वाळुंज प्लांटच्या अधिकार्‍यांकडून मिळाली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे युनियनकडून सुरक्षेच्या दृष्टीने हा कारखाना तात्पुरता बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बजाज ऑटो फॅक्टरीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कंपनीने त्यांच्या कर्मचार्‍यांना पत्राद्वारे कळवले आहे की, जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांना पगार मिळणार नाही. बजाज ऑटो वर्कर्स यूनियनचे अध्यक्ष थेंगडे बाजीराव यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी कामावर येण्यास घाबरत आहेत आणि काहींनी सुट्टी घेतली आहे. आम्ही कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 10 ते 15 दिवसांसाठी प्लांट बंद ठेवावा अशी मागणी केली आहे. मात्र कंपनीकडून त्यांना असे सांगण्यात आले की, याचा काही फायदा होणार नाही, कारण काम संपल्यानंतर सर्वजण एकत्रित येत आहेत.