‘व्हॅलेंटाईन डे’ला बजरंग दलाची ‘दादागिरी’, पार्कमध्ये बसलेल्या जोडप्याचं लावलं थेट ‘लग्न’

रांची : वृत्तसंस्था – झारखंडची राजधानी रांचीमध्ये व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रेमाचा रंग बेरंग करुन टाकला. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रांचीच्या बागेत बराच उतमात माजवला. जय श्री रामची नारेबाजी करत बागेत घुसत अनेक प्रेमींना त्रास देण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर एका जोडप्याचे लग्न देखील लावून दिले.

बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी प्रेमी युगुलांचे जबदरदस्ती फोन काढून घेऊन त्यांच्या घरच्यांना कॉल केले. तसेच बागेत परत न येण्याची धमकी दिली. जेव्हा ही माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह अनेक प्रेमी युगलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की पोलीस जेव्हा बागेत पोहचले तेव्हा हा प्रकार थांबवण्यात त्यांना यश आले.

जमशेदपूरच्या जुबली पार्कमध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि शिवसैनिकांनी प्रेमी युगलांच्या विरोधात जुबली पार्कमध्ये पोहोचून आंदोलन केले. बजरंग दलाच्या लोकांनी प्रेमी युगलांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रेमी युगुलांनी तेथून स्वत:ची सुटका करुन घेतली. बजरंग दल आणि शिवसैनिकांमुळे शहरातील बागेत सुरक्षा तैनात करण्यात आली होती.