बालकामगारांना कामावर ठेवणे व्यावसायिकाला पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बालकामगारांना कामावर ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एका बेकरी व्यासायिकाला ३ महिने कारावास आणि १० हजार रुपयांची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. पाटील यांनी  सुनावली.

शमीम अहमद युसूफ अन्सारी (वय 50, रा. सुखसागरनगर, कात्रज, मूळ. उत्तरप्रदेश) असे व्यावसायिकाचे नाव. याप्रकरणी एका ५७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

अन्सारी हा शॉप अक्टनुसार परवाना न काढताच बेस्ट बेकर्स नावाने बेकरी सुरु केली होती. तेथे दोन अल्पवयीन मुलांना त्याने कामावर ठेवल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी २२ मे २०१५ रोजी केलेल्या कारवाईत उघड झाले होते. त्यांच्याकडे पावाच्या लाद्या उचलून ठेवणे आणि इतर कामे करण्याची जबाबदारी होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी ७ साक्षीदार तपासले. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. पाटील यांनी त्याला ३ महिने कारावास आणि १० हजार रुपयांची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस नाईक सुशांत फरांदे यांनी मदत केली.