बकरी ईद साजरी करण्याच्या गाईडलाईनमध्ये बदल करा, काँग्रेस नेत्याचा सरकारला कडाडून विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्याबाबत राज्य सरकारने नवी गाईडलाईन जाहीर केली आहे. मात्र, सरकारच्या या गाईडलाईनला काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी कडाडून विरोध केला आहे. या नवी गाईडलाईनमध्ये बदल करावा, अशीही मागणी पत्राव्दारे केली आहे.

काँग्रेस नेते नसीम खान यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. बकरी ईद साजरी कशी करावी ?, या संदर्भात राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना नसीम खान यांनी विरोध दर्शविला आहे. प्रतिकात्मक बकर्‍याची कुर्बानी होऊ शकत नाही किंवा ऑनलाइनही खरेदी होऊ शकत नाही. प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची ही मार्गदर्शक तत्वे स्वीकारत नाही, असे नसीम खान यांनी म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने तात्काळ बैठक घेऊन या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करावा, असेही नसीम खान यांनी पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, घरीच साजरी करा बकरी ईद…
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कुठल्याही कारणासाठी गर्दी करणे आपल्याला परवडणारे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद देखील घरीच साजरी करा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यावर्षी वारकर्‍यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणे टाळले. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही यंदा गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करणार आहे, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही घरातच बकरी ईद साजरी करावी, असेही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद संदर्भात मागील आठवड्यात बैठक घेतली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी बकरी ईद साजरी करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात मटन उपलब्ध कसे करून देणार याविषयी विचारणा केली होती. शक्य असेल तिथे ऑनलाईन मटन विक्रीस प्राधान्य द्यावे. मटन शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर घेता येईल का? याबाबत उपाय योजना करावी, असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते. ’हा कोरोना व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देता कामा नये. मी मुल्ला, मौलवींशी यासंदर्भात चर्चा करीन, असेही उध्दव ठाकरे म्हणाले होते.

राज्य सरकारच्या काय आहेत गाईडलाईन पुढीलप्रमाणे :
– बकरे खरेदी करा ऑनलाइन…
-बकरे खरेदी करण्यासाठी बाजार भरणार नाही…
– कुर्बानीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी करू नये…
– प्रतिबंधित क्षेत्रात राहणार्‍या मुस्लिम बांधवांनी आपल्या नावानं ग्रीन झोनमध्ये राहणार्‍या नागरिकांकडून कुर्बानी करून घ्यावी, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याबाबत काळजी घ्यावी…
-काही एनजीओंनी याबाबत पुढाकार घेतला आहे. मुंबईबाहेर कुर्बानी करण्याची व्यवस्था केली आहे.
– राहत्या घरीच बकरी ईदची नमाझ अदा करावी.

या गाईडलाईनमध्ये राज्य सरकारने बदल करावेत, अशीही मागणी केली जात आहे. त्यामुळे बकरी ईद सण उत्तम प्रकारे साजरा करण्यात येईल. काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी बाबतचे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे. आता याची दखल घेऊन राज्य सरकार या गाईडलाईनमध्ये काय बदल करणार? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.