मनसेच्या बाळा नांदगावकरांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र, म्हणाले – ‘मुख्यमंत्रीजी घर सोडा, अन्यथा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही,” अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक ह्या पावसाने वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या वरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे.

“मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत होतो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही.तसेच थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल,” असा टोला देखील बाळा नांदगावकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना लागवण्यात आला आहे.

मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. पण तरीही शेतकऱ्यांनी हार न मानता पेरणी केली होती. पिकांनी तग धरल्यामुळे हि मेहनत फळाला येत होती. पण परतीचा पाऊस झाला आणि सगळं होत्याच नव्हत झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक ह्या पावसाने वाया गेलं. शेतकऱ्यांची सगळी मेहनत वाया गेली.

औरंगाबादमध्ये या शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन आणि कपाशीचे पीक घेतले होते. मात्र कालपासून सतत पडत असलेल्या पावसाने संपूर्ण जमीन पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी मक्याचे पीक घेतले. मात्र, बाजारात त्याला भाव नाही. म्हणून आम्ही पुन्हा पेरणी करून कपाशीचे पीक घेतले तर ह्या पावसाने संपूर्ण शेतीच पाण्याखाली गेली आता आम्ही जगायचे कसे, आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे, असा सवाल एका उद्विग्न शेकऱ्याकडून विचारण्यात आला.