बालाजी मंदिर ब्रह्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – श्री बालाजी मंदिराच्या ब्रह्मोत्सवानिमित्त लासलगावी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. गुरु महिमा हा संदेश शोभायात्रेतून यावेळी देण्यात आला. लासलगाव व परिसरातील सर्वच शाळातील शिक्षक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. लेझीम पथक व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी तसेच आकर्षक चित्ररथ यांनी नागरिकांचे व भाविकांचे लक्ष वेधले.

येथील बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव शनिवार व रविवार रोजी संपन्न झाला. ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी गरुडध्वज हनुमान चालीसा पाठ संपन्न झाल्यानंतर विविध शाळांतील 300 विद्यार्थ्यांची गुरुमहिमा या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी गोविंदा बाल संस्कार केंद्राच्या सुमारे 125 विद्यार्थ्यांनी गुरू महिमा या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

ब्रह्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ कलर अभिषेक महाआरती संपन्न झाले. दुपारी 3 वाजता शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून भव्य शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. विंचूर येथील बाबूलाल ब्रास बँड यांनी भक्तीपर गीते सादर करून भाविकांचे लक्ष वेधले. गुरु महिमा हा विषय असल्याने सरस्वती चे रूप रेखा नीलेश वर्मा व श्री गणपतीचे रूप नील नितीन वाघ यांनी साकारले होते यांची सजावट येथील कलाकार दत्ता भांबारे व सपना भांबरे यांनी केली होती.

श्री महावीर विद्यालयाचे लेझीम पथक तसेच लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व श्री महाविद्यालयाचे एनसीसी पथक तसेच शहरातील सर्वच शाळांमधील शिक्षक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. श्री बालाजी भगवान यांची चांदीचे अभूषण असलेला मूर्ती तसेच श्री घनश्याम आचार्य जी महाराज यांची विशेष उपस्थिती या मिरवणुकीत होती. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक श्री बालाजी मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावेळी भाविकांनी ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. श्री बालाजी मंदिरात महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गोविंद सेवक, गोविंद सेविका व विविध मंडळांचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

गोविंद पुरस्काराच्या मानकरी ठरल्या सुशीला आंबेकर

श्री बालाजी भक्तवत्सल सेवा समितीच्या वतीने दरवर्षी ब्रह्मोत्सवात गोविंद सेवक हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षिका सुशीला आंबेकर यांना श्री 1008 घनश्यामचार्यजी महाराज व ह भ प त्र्यंबक बाबा भगत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देण्‍यात आला. तसेच अरुण खांगळ, समीर देवढे, प्रशांत तुपे या गुरुजनांचा सत्कार या वेळी करण्यात आला. तसेच ज्योती ताथेड व न्यायाधीश परीक्षेत यश मिळवलेल्या श्वेता घोडके, शांताबाई दायमा, सुलेमन मुलानी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.