Video : बालाकोट एअरस्ट्राईक ! पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा नवा व्हिडीओ जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन वर्षापूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून 26 फेब्रुवारी 2019 रोजी ‘बालाकोट एअरस्ट्राईक’ करण्यात आला होता. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक करुन दहशतवद्यांचे ठिकाण नेस्तनाबूत केलं होतं. याच घटनेला आज दोन वर्षे पूर्ण होत असताना पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा एक नवा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.

भारताने एअरस्ट्राईक केल्यानंतर 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ 16 विमानांना भारतीय जवानांनी पिटाळून लावलं होतं. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मोठ्या बहादुरीनं यातील एफ 16 विमान पाडलं. मात्र, याच प्रयत्नात त्यांचं विमान पाकिस्तानात जाऊन कोसळलं होतं. यावेळी पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर जागतिक स्तरावरुन दबाव वाढल्यानंतर पाकिस्तानने दोन दिवसांनी म्हणजे 1 मार्च रोजी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताच्या सुपूर्द केलं.

अभिनंदन यांनी सांगितला अनुभव
पाकिस्तानने आज एक व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात होते. जारी करण्यात आलेल्या व्हिडीओ मध्ये वर्धमान हे पाकिस्तानी सेनेसमोर आपला अनुभव व्यक्त करता दिसत आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये अनेकदा छेडछाड केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रोपोगंडा फैलावण्याच्या उद्देशाने पाकिस्तानकडून हा व्हिडीओ जारी केला असल्याचे म्हटले जात आहे.

कैदेत असतानाही दबावात नाहीत
जारी करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये विंग कमांडर दोन्ही देशांच्या समानता व्यक्त करताना दिसत आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेले अभिनंदन सावध दिसत आहे, मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर भिती दिसत नाही. पाकिस्तानी लष्कराच्या कैदेत असतानाही आणि दबावाखाली असतानाही ते आपलं म्हणणं स्पष्ट मांडताना दिसत आहेत. एखाद्या बहादूर जवानासारखं ते समोर असलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाताना दिसत आहेत.

कोणतीही माहिती देण्यास नकार
एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानने अनेक व्हिडीओ जारी केले आहेत. मात्र, हा व्हिडीओ यापूर्वी कधीच जारी केला नाही. या व्हिडीओमध्ये विंक कमांडर अभिनंदन लष्कराने ताब्यात घेतल्यानंतरचा त्यांचा अनुभव सांगत आहेत. मात्र, पाकिस्तानी लष्कराला कोणत्याही प्रकारे माहिती देण्यास अभिनंदन यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे या व्हिडीओतून समोर आलं आहे.