सहकार मंत्र्यांनी दिले ‘किनस वीर’च्या चौकशीचे आदेश

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या गैरकारभारामुळे शेतकरी अडचणीत येणार असल्याने संबधितावर कारवाई करण्याबाबत आमदार मकरंद पाटील व सभासद शेतक-यांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार या संस्थेच्या कारभाराची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याबाबत मी साखर कारखाना आयुक्तांना निर्देश दिल्याचे सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील ( Cooperative and Guardian Minister Balasaheb Patil ) यांनी सांगितले.

किसन वीर साखर कारखान्याची सद्यस्थिती बिकट असून यंदा सभासद शेतक-यांच्या उसाचे पुर्ण गाळप होईल की नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याचे सांगत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभासद शेतक-यांच्या शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृहावर मंत्री पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मकरंद पाटील व जिल्हा बॅंक संचालक नितीन पाटील यांनी कारखान्याचा कारभार व त्यामुळे शेतक-यासमोर निर्माण झालेल्या समस्येची माहिती मंत्री पाटील यांना दिली.

शेतक-यांचे निवेदन स्विकारल्यानंतर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, सभासद शेतक-यांनी कारखान्यात सुरु असलेल्या गोंधळाची निवेदनाद्वारे माहिती दिली. कै. आबासाहेब वीर यांनी स्थापन केलेला हा साखर कारखाना टिकला पाहिजे. निवेदनानुसार कारखाना व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत अनेक गंभीर आक्षेप मांडले आहेत. विशेष म्हणजे व्यवस्थापनाने एकाच व्यापा-याला सर्व उत्पादन कमी दराने विकल्याचा झालेला आरोप गंभीर आहे. त्यामुळे मंत्री म्हणून मी या कारखान्याच्या चौकशीचे आदेश देत आहे. विशेष लेखा परीक्षणानंतर दोषी आढळल्यास संबधितावर कारवाई करण्यात येईल.