Video : देवेंद्र फडणवीसांनी ठेवलं शिवसेनेच्या स्वाभिमानावर बोट; ट्विट केला बाळासाहेबांचा व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आले असतानाही उदयास आलेल्या महाविकास आघाडीमुळे भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले आहे. त्यावेळी शिवसेनेनं केलेल्या खेळीमुळे राज्यात राजकारणातील नवे समीकरण पाहायला मिळालेच पण भाजपलाही धोबीपिछाडी केली. त्यामुळे सत्ता स्थापनेपासून भाजप आणि शिवसेना यांच्यात कोणत्याना कोणत्या मुद्द्यावरून नेहमीच खटके उडत असतात. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यानिमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांची भाषणातील काही विधानं असलेला एक व्हिडीओ ट्विट करत अभिवादन केलं. मात्र, सत्ता आणि स्वाभिमान यांच्या संदर्भातीलच विधानं या व्हिडीओत घेतलेली आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपाची शिवसेनेवरील नाराजी लपून राहिलेली नाही. भाजपाच्या नेत्यांकडून शिवसेनेला वेगवेगळ्या मुद्द्यावरून चिमटे काढण्यात आले. हिंदूत्वापासून ते स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यापर्यंत अनेक मुद्दे भाजपाकडून उपस्थित केले गेले आणि शिवसेनेला धारेवर धरण्याचा प्रयत्न झाल्याचंही अनेकदा दिसलं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन एका वर्षापेक्षा अधिक काळ लोटून गेला असला, तरी भाजपाची शिवसेनेवरील नाराजी कमी झाली नसल्याचंच पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्तानं राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांची भाषणातील काही विधानं असलेला एक व्हिडीओ ट्विट करत अभिवादन केलं. मात्र, सत्ता आणि स्वाभिमान यांच्या संदर्भातीलच विधानं या व्हिडीओत घेतलेली आहेत.

विशेष म्हणजे फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून डिवचण्याचा प्रयत्नही व्हिडीओच्या माध्यमातून केल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजपचं सत्ता गमावण्याचं शल्य अजूनही कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपाकडून सतत हिंदुत्वावरून शिवसेनेवर निशाणा साधल्याचं दिसून आलं आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मंदिरं सुरू करण्यावरून भाजपाने शिवसेनेला हिंदुत्वाचा वारंवार हवाला दिला होता. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत असून, शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची टीकाही भाजपा नेत्यांकडून करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा फडणवीस यांनी त्याच मुद्द्यावर बोट ठेवत शिवसेनेला चिमटा काढला आहे.