Balasaheb Thorat : ‘सर्व पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या आणि तातडीने लसीकरण करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनाने कहर केला असून, बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सरकारने लस देण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केलीय.

थोरात यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी करत म्हटले की, कोरोनाच्या संकटकाळात आपण अत्यंत संयमाने महाराष्ट्राची काळजी घेत आहात. अनेक लोकोपयोगी निर्णय आपण घेतले आहेत. आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यरत आहे. एक विषय मात्र आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही धोका आहे. म्हणून अशा सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी मंत्री थोरात यांनी केली आहे.

पुढे थोरात यांनी म्हटले आहे की, तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश मध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. तरी आपण देखील या संदर्भाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे थोरात यांनी म्हटले आहे. या दरम्यान, पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकीत टीएमसीने विजय संपादन केल्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी बंगाल राज्यातील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. म्हणून सरकारच्या अनेक योजना आणि सोयी सुविधांचा राज्यातील पत्रकारांना अधिक लाभ मिळणार आहे.