… तर राज्यात कॉंग्रेसचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्लीतील नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राजकीय वर्तुळात आहे, परंतु अद्याप याबाबत घोषणा झाली नाही. मात्र प्रदेशाध्यक्षपदावरून आता पक्षात दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे खासदार बाळू धानोरकर यांनी विदर्भाला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मिळावे, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी बाळासाहेब थोरात यांचीच प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करावी अशी मागणी केली आहे. थोरात हेच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे, तरच आगामी काळात राज्यात काँग्रेसच सरकार येऊ शकेल असे त्या म्हणाल्या. ठाकूर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांकडे आपले मत व्यक्त केले आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यात प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी थोरातांनी दर्शवली होती. सुरूवातीला पक्ष नेतृत्वाने थोरातांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये पक्ष संघटनेत बदलाच्या हालचाली सुरु झाल्या. यात नाना पटोले यांचे नाव चर्चेत आहे.

ठाकूर म्हणाल्या, की, मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 12-13 जागा येतील असे म्हटले जात होते. त्यावेळी कोणीही प्रदेशाध्यक्ष बनण्यास तयार नव्हते. अडचणीच्या काळात थोरात यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत 44 जागांचे यश खेचून आणले. त्यामुळे थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढीलवेळी काँग्रेसचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे सहप्रभारी आशिष दुवा आणि बी. एम. संदीप यांच्यासमोर हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड निश्चित समजले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पटोलेंनी काँग्रेसच्या स्वबळाचे विधान केले आहे. राज्यात स्वबळावर काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.