विनाअनुदानित शाळांना धोरणानुसार अनुदान, बाळासाहेब थोरातांनी सांगितलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीचे शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. विनाअनुदानित शाळांना सरसकट २० टक्के अनुदानाचे सूत्र रद्द करुन प्रचलित धोरणानुसार अनुदान देणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत शनिवारी सांगितले. या निर्णयाविरुद्ध विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत १०० टक्के अनुदान तातडीने देण्याची मागणी केली.

विक्रम काळे यांनी यासंदर्भात महत्वाची सूचना मांडली होती. ते म्हणाले कि, २०१४ मध्ये सत्तेत येण्याअगोदर तत्कालीन भाजप सरकारने अनेक आश्वासने दिली होती. त्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विनाअनुदानित शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर १ हजार ६५८ शाळांना अनुदान देण्यास सुरुवात केली. मात्र, पाच वर्षांनंतरही या शाळांना १०० टक्के वेतन अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे, त्या शासनाने केलेले महापाप होते. त्यानंतर, हे सरकार २०-४०-६०-८०-१०० टक्के या प्रचलित धोरणाप्रमाणे अनुदान देणार का, असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, नागो गाणार यांनी यासंदर्भात शासनाचा निषेध करण्याची भूमिका घेत, ४० टक्क्यांचे अनुदान अजून का मिळाले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तर रणजित पाटील व अनिल सोले यांनी आक्रमक पवित्रा घेत १०० टक्के अनुदान तातडीने देणार का? अशी विचारणा ह्या सरकारला केला. दरम्यान, शासन याबाबत सकारात्मक आहे, असे थोरात सांगत असताना विरोधकांनी ठोस उत्तराचा आग्रह धरला. त्यांनतर विरोधक सभात्याग करण्याच्या पवित्र्यात असतानाच सभागृहाची बैठक काही मिनिटांसाठी स्थगित करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/