…तर पिचड पिता-पुत्रावर ही वेळ आली नसती, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचा विखेंना ‘टोला’

अकोले (नगर) :  पोलीसनामा ऑनलाइन – पिचड पिता-पुत्रांना कुणी वाट दाखविली हे मला माहित नाही. पण त्यांना योग्य वाट दाखवली असती, तर पिचडांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला नसता, असा चिमटा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काढला.

संगमनेर साखर कारखान्यावर अकोले विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ.डॉ.किरण लहामटे यांचा संगमनेर तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सत्कार सोहळ्यातून प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की,अकोले तालुका हा डाव्या चळवळीचा तालुका आहे, म्हणून या तालुक्यात जातीयवादी पक्षाची नागरिकांनी खऱ्या अर्थाने हकालपट्टी केली आहे. अकोले मतदार संघातील लोकांना यंदा पिचड नकोच होते.त्यातच नियतीने पक्ष बदलाचा खेळ खेळला अन् पिचडांना जनतेने घरी बसविले, असा टोलाही थोरात यांनी लगावला.

आ.डॉ.किरण लहामटे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत.तळागाळातील लोकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळेच अकोले मतदारसंघाने न भूतो न भविष्यती असे मताधिक्य लहामटेंच्या पारड्यात टाकले असल्याचे ही थोरात म्हणाले.यावेळी डॉ.किरण लहामटे यांचा शाल पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना आ.लहामटे म्हणाले की, माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला थोरात साहेब तुम्ही तिकीट मिळवून दिले.अन्यथा मी आज आमदार झालोच नसतो. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे थोरात साहेबांनी शिफारस केल्याने माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले, असेही लहामटे म्हणाले.

आगामी काळात अकोले मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी झटणार आहे. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणार आहे, असेही आ.लहामटे म्हणाले. या सत्कार सोहळ्यास अहमदनगर जिल्हा परिषदेचे पशु व कृषी विभागाचे सभापती अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.