“विखे आले की म्हसणवट्या पुढाऱ्यांना स्फुरण चढते”

अहदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ‘विखे आले की या भागातील दहावे आणि अंत्यविधीमध्ये भाषणे करणाऱ्या म्हसणवट्या पुढाऱ्यांना स्फुरण चढते. अशी जोरदार टीका माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. निमोण येथे विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका केली होती आता त्याच ठिकाणाहून थोरात यांनी विखेंवर पलटवार केला आहे. निमोण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.

हेही वाचा – राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार संपूर्णत: ‘त्यांनाच’ 

यावेळी बोलताना थोरात यांनी विखेंना सहकार्य करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांवर शाब्दिक शस्त्रास्त्र उगारले. ते म्हणाले,” गेल्या ३५ वर्षात असे खालच्या पातळीचे भाषण आपण ऐकले नाही. पुढच्या काळात वडीलधाऱ्यांना असे ऐकण्याची वेळ येऊ नये. आपण कधीच काही चुकिचे केले नाही. उसाला अडीच हजार रुपये ‘एफआरपी’ दिला. मात्र त्यांची भणभण आमच्या इथं काढली. “त्यांचा विंचू चढवायचा कार्यक्रम सुरुच आहे. चांगले चाललेले मोडून काढायचा त्यांचा उद्योग असतो. काॅंग्रेसच्या सर्वोच्च बाॅडीचा मी सदस्य आहे, पण पोरगं इथं येऊन बोलतंय कसं. आपण अन्नात माती कालवायचे काम केले नाही. मात्र, म्हणसवट्याच्या पुढाऱ्याला ते कळत नाही. केवळ म्हसणवट्यात भाषणे करणा-या या स्वयंघोषित पुढा-यांबरोबर दोन-चार लोकही नसतात. तरीही त्यांना विखे आले की स्फुरण चढते. भाषणेच करायची असतील तर त्यासाठी आमचे लोक ऐकायला पाठवितो.’’

हेही वाचा – मनधरणीसाठी दानवेंची खोतकरांच्या घरी पायधुळ

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, “निळवंड्याच्या कामाला गती देऊन २०१२ मध्ये पाणी अडविले. बोगद्यांची तीस टक्के कामे केली. मधुकर पिचड सोडून या कामी कोणीही मदत केली नाही. ५०० कोटी रुपये साईबाबा संस्थानने दिले, मात्र त्याला स्थगिती मिळाली. कोर्टाच्या बाबतीत ही मंडळी प्रसिद्ध आहे. मात्र, आम्ही करतो ते प्रामाणिकपणे करतो. तुम्ही कोणाच्या दिशाभुलीला बळी पडू नका. सर्व वाहिन्या एका उद्योजकाकडे आहेत. त्यामुळे देशात भाषणांचा भूलभुलैय्या सुरू आहे. लोकांनी त्यांना बहुमत देऊनही राममंदिर बांधलं नाही. केंद्रात व राज्यात असा बनवाबनवीचा कार्यक्रम सुरू आहे,” असा आरोप थोरात यांनी केला.
या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. आमदार सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे यावेळी उपस्थित होते.