भूमी अभिलेखचे उपसंचालक वानखेडेंची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पर्वती येथील जमिनीसंदर्भात तक्रारदारांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर वकिलाच्या मार्फत १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या गुन्ह्यात कट रचण्यात सहभागी असल्याचे १२० बी हे कलम लावले आहे. वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अ‍ॅड. रोहित शेंडे याला २६ डिसेंबर रोजी एक कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याबाबत अ‍ँटी करप्शनने यापूर्वी वानखेडे याच्याकडे चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी शेंडे याच्याशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वानखेडे याच्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले असून ज्या कॉम्प्युटरवर हा निकाल टाईप करण्यात आला, तसेच वानखेडे याच्या कार्यालयातील अनेक साहित्य जप्त केले आहे. अ‍ॅड़ शेंडे आणि वानखेडे याच्यातील मोबाईलवरील संभाषणही मिळविण्यात आले आहे. त्यावरुन या प्रकरणात लाच घेण्याचा कट रचल्याचा आरोप वानखेडे याच्यावर ठेवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण झाल्यानंतर काही दिवसांपासून वानखेडे फरार झाले होते. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर आजारी असल्याचे सांगून ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.