Pune News : बालभारतीकडून ‘अभ्यास गट’ बरखास्त !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ताबदलानंतर भाजपच्या काळातील महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने (बालभारती) अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत. आता नव्याने नेमल्या जाणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये सत्तेतील तीन पक्षांशी संबंधित व्यक्तींची नव्या विषय समित्या आणि अभ्यास गटांमध्ये नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात 2014 मध्ये भाजपची सत्ता आली. त्यावेळी विनोद तावडे शिक्षणमंत्री झाल्यावर पहिली ते बारावीचा नवा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विषय समित्या आणि अभ्यास गटांची पुनर्रचना केली होती. बालभारतीच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल करून अभ्यास मंडळ हे नाव बदलून विषय समिती आणि अभ्यास गट करण्यात आले.

2014 ते 2018 या कालावधीत नव्या विषय समित्या आणि अभ्यास मंडळांची नेमणूक केली. नव्या नेमणुकीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. या नेमणुकांमध्ये भाजपसंबंधित सदस्यांची वर्णी लावल्याची चर्चा, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झालेले उद्बोधन वर्ग, पुनर्रचित अभ्यासक्रम आदीवरून वादही निर्माण झाले होते. आता बालभारतीकडून संबंधित विषय समिती आणि अभ्यास गट बरखास्त केल्याचे पत्र संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित सदस्यांना पाठवून देत दिलेल्या योगदानासाठी आभार मानले आहेत.

याबाबत बालभारतीचे संचालक दिनकर पाटील म्हणाले की, आधी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गटांचे कार्य संपल्यामुळे संबंधित सर्व विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहे. आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची निर्मिती होणार असल्याने नवीन अभ्यास गट नियुक्त केले जातील.