बालभारतीच्या 8 वी च्या पुस्तकात ‘अक्षम्य’ चूक, सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात क्रांतिकारी सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख करण्यात आला आहे. ही अक्षम्य चूक असून हे पुस्तक त्वरीत मागे घ्यावे आणि संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात यदुनाथ थत्ते यांचा ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ असा धडा आहे. या धड्यात व्यक्ती शाळकरी मुलांनी देशप्रेमाबद्दल समजावून सांगत आहे. यावेळी त्यांच्यातील संवाद धड्यात देण्यात आला असून एका विद्यार्थ्याने विचालेल्या प्रश्नात “भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”. असा उल्लेख करण्यात आला आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करलं हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पण बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात भगतसिंग, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या नावात करण्यात आलेली ही चूक अक्षम्य असल्याचं ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी म्हटलं आहे. ब्राह्मण महासंघाने हा मुद्दा उपस्थित केला असून हा सुखदेव यांचाच नव्हे तर समस्त क्रांतिकारकांचाच अपमान असल्याचा संताप व्यक्त केला आहे. ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधित लोकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच संभाजी बिग्रेड संघटनेने देखील या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी बालभारतीची अभ्यास समिती तात्काळ बरखास्त करावी व गुन्हा दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच शिक्षणमंत्र्यांनी या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दयावा. अशी मागणी केली आहे.