धक्कादायक ! पोलिसांसमोर भाजप कार्यकर्त्याने केली हत्या, योगी सरकारने दिला ‘हा’ आदेश

बलिया : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात गुन्हेगारांचे धैर्य वाढल्याचं आणखी एका घटनेवरून समोर आलं आहे. बलियाच्या दर्जनपूर गावात पोलीस अधिकाऱ्यांसमोरच भाजपच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक बैठक सुरु असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला. हा प्रकार घडला त्यावेळी पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. अधिकाऱ्यांसमोर हा प्रकार घडल्याने प्रशासनावर टीकेची झड उठली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी आरोपी फरार झाल्याने त्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच पोलीस फरार झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्याचा शोध घेत आहेत. धिरेंद्र सिंह असं या आरोपीचे नाव असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांसमोरच केली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी वाद निर्माण झाला आणि गोळीबार करण्यात आला. घटनेच्यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. आरोपी हा भाजपा आमदाराचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार झाल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

योगी सरकारने दिला ‘हा’ आदेश

या घटनेनंतर योगी सरकार अ‍ॅक्शनमोडमध्ये पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपविभागीय दंडाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही इतरांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे. तसेच अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. मृताच्या नातेवाईकांनी याप्रकरणी तक्रार केली असून काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, असे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.