बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानक देशात सर्वात सुंदर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील विविध रेल्वे विभागातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकांनी पहिला क्रमांक मिळवत देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा मान मिळविला आहे. पुरस्कार स्वरूपात या दोनही स्थानकांना प्रत्येकी १० लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

रेल्वे स्थानक परिसरात कलात्मकतेचा उपयोग करून स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने ‘सुंदर रेल्वे स्थानक’ या संकल्पनेवर आधारीत स्पर्धेचे आयोजन केले. यात देशातील ११ रेल्वे विभागांतून ६२ प्रवेशिका रेल्वे मंत्रालयास प्राप्त झाल्या. यातील उत्कृष्ट रेल्वे स्थानकाच्या निवडीसाठी स्थापीत रेल्वे मंत्रालयाच्या विविध विभागातील तज्ज्ञ व वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या निवड समितीने मध्य रेल्वे अंतर्गत कार्यरत नागपूर विभागातील बल्लारशाह व चंद्रपूर या रेल्वे स्थानकांना देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक म्हणून निवड केली आहे.

बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकांना सुंदररित्या सजविण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकांवर मुख्यत्वे ताडोबा अभयारण्याचे विविध दृष्य चितारण्यात आले आहे. या ठिकाणी येणाऱ्‍या पर्यटक व प्रवाशांना ताडोबा अभयारण्यातील वाघ व वन्यजीव आमंत्रित करीत असल्याचा भास या रेल्वे स्थानकावर येतो.

मधुबनी कलेच्या विलोभनीय दृष्याने आकर्षण ठरलेले बिहार मधील समस्तीपूर विभागातील मधुबनी रेल्वे स्थानक आणि तामीळनाडुतील मदुराई रेल्वे स्थानकांनी संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच गुजरातेतील गांधीधाम, राजस्थानातील कोटा आणि तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकाविला आहे. दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्‍या रेल्वे स्थानकास प्रत्येकी ५ लाखांचा तर तिसरे स्थान पटकाविणाऱ्‍या रेल्वे स्थानकास ३ लाखांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.