कोण आहे ‘हा’ महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव विजयी उमेदवार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काल भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. २०१४ पेक्षा यावेळी जास्त जागा भाजपने जिंकत काँग्रेसचा धुव्वा उडवला. भरीस भर म्हणजे यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहून गांधी यांचा अमेठीत झालेला पराभव. त्यामुळे काँग्रेस यावेळी मुसंडी मारेल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आलेल्या या निकालाने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना चिंतन करायला लावले आहे.

देशभराप्रमाणेच महाराष्ट्रात देखील काँग्रेसची वाताहत झाली. यावेळी लढवलेल्या २५ जागांपैकी फक्त १ जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले. आणि ते देखील शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या उमेदवाराच्या बळावर. त्यामुळे या विजयात काँग्रेसचा नाही तर शिवसेनेतून आलेल्या उमेदवाराचा मोठा वाटा आहे. या जिंकून आलेल्या उमेदवाराचे नाव आहे बाळू धानोरकर.

शिवसेना ते काँग्रेस प्रवास

बाळू धानोरकर हे शिवसेनेचे आमदार होते. चंद्रपूरमधील ‘वरोरा’ मतदारसंघातून ते आमदार होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या ठिकाणी भाजपच्या हंसराज अहीर आणि काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्यात थेट लढत होती. यात बाळू धानोरकर यांनी बाजी मारली. सुरेश धानोरकर यांना ५ लाख ५९ हजार ५०७ मते मिळाली तर हंसराज अहीर यांना ५ लाख १४ हजार ७४४ इतकी मते मिळाली.