काळ्या रंगाचे जॅकेट घालून ३ वर्षाच्या चिमुकल्याने केला मुख्यमंत्र्यांचा निषेध 

वृत्तसंस्था – आसामची राजधानी गुवाहाटी येथे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या सभेमध्ये निषेध व्यक्त केला जाण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी चक्क एका ३ वर्षांच्या मुलाच्या अंगातील काळ्या रंगाचे जॅकेट काढण्यास भाग पाडले. जॅकेटचा काळा रंग हा निषेधाचे प्रतिक असल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही काळापासून आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी संशोधन विधेयकाच्या विरोधातील वातावरण आहे. मुख्यमंत्री सोनोवाल आणि इतर भाजपाच्या मंत्र्यांच्या अनेक सार्वजनिक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. दरम्यान, सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये इतरही काही लोक आपल्या अंगातील काळे कपडे काढताना दिसत आहेत. या प्रकाराबाबतचे वृत्त वाहिन्यांवरुन प्रसारित झाल्यानंतर मुख्यमंत्री सोनोवाल यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री सोनोवाल यांची सभा आसामच्या विश्वनाथ जिल्ह्याच्या बेहाली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी वातावरणात मोठा गारवा होता दरम्यान त्यांनी एका रेशीमाचे कपडे बनवणाऱ्या मिलचे उद्घाटन केले. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रंजीत दास यांनी सरकारकडून अशा प्रकारे पोलिसांना कुठलेही निर्देश दिले नव्हते असे सांगितले.

दास म्हणाले, लोकांना काळे कपडे घालण्यास कोणताही प्रतिबंध लावता येणार नाही. मात्र, पोलिसांनी असे का केले हे मला ठाऊक नाही. अशा प्रकारचे कोणतेही निर्देश सरकारकडूनच काय पक्षाकडूनही देण्यात आलेले नाही. पोलिसांनीही असा प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. विश्वनाथ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश रोशन म्हणाले, हे चुकीचे वृत्त असून आम्ही संबंधीत महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यामध्ये तिने मुलाला उकडत असल्याने त्याचे काळे जॅकेट काढल्याचे सांगितले आहे.