कोल्हापूर दंडाधिकाऱ्यांकडून जिल्हा बंदीचे आदेश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन यातून पूरग्रस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात १४ ते २४ ऑगस्ट दरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी केल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत अनेक पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

आज राज्यामध्ये मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा बकरी ईद सण, १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात साजरा होणारा स्वातंत्र्यदिन आणि २४ ऑगस्ट रोजी साजरा होणारा दहीहंडीचा सण आदिंचे औचित्य साधून आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like