ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! सुटी सिगारेट आणि बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार यापुढे राज्यात कुठे सुद्धा सुटी सिगारेट व बिडी विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस व महापालिका यांनी तात्काळ या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात एक मराठी वृत्तपत्राने माहिती दिली.

राज्यातील शाळा-कॉलेजमधील तरुणाई मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगारेट पासून गुटख्याच्या आहारी गेल्याच समोर येत आहे. अनेक सरकारांनी दारूबंदी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक बैठक घेतल्या मात्र त्यातून निष्पन्न काही झाले नाही. याआधी आरोग्य विभागाने सुटी सिगारेट व बिडीची विक्री होऊ नये म्हणून विधी व कायदा विभागासोबत सरकारकडे पाठपुरावा केला होता. पण विधी विभागाकडून पुरेसे पाठबळ न मिळाल्याने आरोग्य विभागास आदेश काढता आला नाही.

दरम्यान, सिगारेट पाकीट किंवा बिडी बंडलाची विक्री केल्यास २००८ च्या कायद्यानुसार अपेक्षित असलेला संदेश ‘आरोग्याच्या धोक्याची कल्पना’ मिळतो. पण तेच सुटी म्हणजे सिगारेटच्या पाकिटातून एकेक सिगारेट काढून विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही. आरोग्य विभागाचे हे मत विधी व न्याय विभागाने आता कोरोनाच्या अनुषंगाने मान्य केल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे यापुढे सिगारेट वा बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट वा बिडी बंडल विकत घ्यावे लागणार असून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात व्यसनांकडे वळलेल्या तरुणाईला रोखण्यासाठीच हा आदेश काढल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

यापूर्वी केंद्राने घातली ई-सिगारेटवर बंदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १९ सप्टेंबर २०१९ रोजी ‘ई-सिगारेट’च्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातल्याची घोषणा केली. धूम्रपान रोखण्यासाठीचा पर्याय म्हणून ‘ई-सिगारेट’कडे पाहिले जात होते; परंतु, त्यात अपयश आल्याने बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.