बाणेरला तब्बल ३६ लाखांचा गांजा पकडला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई-बंगळुरू हायवेवर बाणेर येथे ३५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा १५० किलो गांजा जप्त केला आहे. तर दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी बुधवारी १ मे रोजी करण्यात आली आहे.

योगेश दत्तात्रय जोध (२८, रा. चंदननगर, जुळे सोलापूर, जि. सोलापूर) आणि सागर दिगंबर कदम (२८, रा. वामननगर, जुळे सोलापूर, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून मुंबई-बंगळुरू महामार्गावरून गांजा विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त आर.के. पदमानाभन, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक श्रीराम पोळ, फौजदार वसंत मुळे, प्रशांत महाले, हवालदार राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, प्रदीप शेलार, पोलीस नाईक दिनकर भुजबळ, संतोष दिघे, पोलीस शिपाई दादा धस, प्रसाद जंगीलवाड, अशोक गारगोटे, शैलेश मगर, प्रदीप गुट्टे व महिला पोलीस शिपाई अनिता यादव यांनी सापळा लावला.

बाणेर जवळच्या बिटवाईज कंपनीजवळ संशयावरून योगेश जोध व सागर कदम यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ३५ लाख ८८ हजार रुपयांचा १५० किलो गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा नक्की कोठून आणण्यात आला याचा तपास सुरु आहे.

Loading...
You might also like