COVID-19 : बेंगळुरूची स्ट्राइड्स फार्मा लवकरच कोरोनाच्या औषधाची मानवावर क्लिनिकल चाचणी सुरु करणार

बेंगलुरू : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस देशात वेगाने पसरत आहे. जगभरातील वैज्ञानिक या विषाणूला रोखण्यासाठी औषध आणि लस शोधत आहेत. काही देशांनी वॅक्सिन बनवल्याचा दावा करून याची चाचणी माकडांवर केली आहे. त्यानंतर ते आता याची ट्रायल मानवावर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे इतर देशातील शास्त्रज्ञांकडून देखील कोरोनावर औषध शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. जगभरातील औषध कंपन्या यावर वेगाने काम करीत आहे.

यामध्ये आता बंगळुरू मधील स्ट्राइड्स फार्मा या कंपनीचे नाव जोडले गेले आहे. ही कंपनी लवकरच कोरोनाचे औषध फवीरपीरवीरची क्लिनिकल चाचणी सुरु करणार आहे. स्ट्राइड्स कोरोना व्हायरसवरील औषधाचा शोध सुरु करणारी देशातील दुसरी औषध कंपनी आहे. कंपनी कोरोना व्हायरसविरुद्धच्या अँटीव्हायरस औषधांवर अभ्यास करत आहे. यापूर्वी ग्लेनमार्क फार्माने कोरोना व्हायरसवर औषध बनवण्याचे काम सुरु केले आहे.

स्ट्राइड्स फर्माचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष अरूण कुमार यांनी कंपनीचा रिपोर्ट जाहीर केल्यानंतर सांगितले की, आम्हाला औषधांचा मानवी अभ्यास करण्यास भारतीय औषध नियामकांकडून मान्यता मिळाली आहे. क्लिनिकल चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, औषधांचा वापर कोठे केला जाईल याचा खुलासा त्यांनी केला नाही. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या कंपनीला देशातील औषधोपयोगी अभ्यासासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे.