वाळू तस्करांनी तलाठ्याला ट्रक खाली चिरडले 

कर्नाटक : वृत्तसंस्था – वाळू तस्करांची मुजोरी देशाला नवी नाही. परंतु वाळू तस्करांकडून एवढे निर्घृण कृत्य केले जाईल याची कल्पना देखील केली जात नाही  म्हणूनच या घटने बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रायचूरमध्ये तलाठ्याने वाळू उपशाला विरोध केला म्हणून त्या तलाठ्याला ट्र्क खाली चिरडून मारण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चालक रंगप्पा याला अटक करण्यात आली असून घटना घडल्या नंतर अवघ्या काही तासातच आरोपीला पोलिसांकडून करण्यात आली आहे.

साहेब पटेल तलाठी रायचूर गावी तलाठी पदावर होते. ते मूळचे बेकलपर्वी ता. मान्वी, जि. रायचूर या गावचे रहिवासी आहेत. तुंगभद्रा नदीतून केल्या जाणाऱ्या अवैध वाळू उपशाला साहेब पटेल हे विरोध करत होते. त्याच प्रमाणे त्यांच्या या कृत्याचा वाळू उपसा करणाऱ्या तस्करांनी मनात राग धरून हे हिंसक कृत्य केले आहे. वाळू तस्करांनी अंगावर ट्र्क घातल्यामुळे साहेब पटेल यांचे दोन्ही पाय चिरडले गेले आणि त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्त स्त्राव होऊ लागला तर  वाळू तस्कर जागीच ट्र्क सोडून पळून गेला. साहेब पटेल यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करताच काही क्षणात साहेब पटेल यांचा मृत्यू झाला. साहेब पटेल यांच्या निर्घृण हत्येने रायचूर भागात घबराहट पसरली आहे.

रायचूर या गावी वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने त्या ठिकणी एकाच पासिंगचे चार-चार ट्र्क वाळू उपसा करतात. या ठिकाणाहून वाळू वाहतूक केली जाते आहे. या वाहतुकीला कसलाच सरकारी चाप नसल्याने या गावात गुंडाराज पसरले आहे. या कृतीवर पायबंद घालण्याच्या उद्देशाने साहेब पटेल हे रत्यावर उतरले होते. त्यांच्या कार्यवाहीमुळे  थोड्या फार प्रमाणात गावातील लोकांना दिलासा वाटू लागला होता परंतु  त्यांची हत्या झाल्यामुळे लोकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. साहेब पटेल यांच्या घरच्यांकडून सरकारकडे  मदतीची याचना केली असून घरातील कर्ता पुरुष निघून गेल्यामुळे कुटुंबावर मोठे अकस्मात संकट कोसळले आहे. तर साहेब पटेल यांचा निर्घृण खून करणाऱ्या ट्र्क चालकाला फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.