बांगला देशात रसायनाच्या गोदामाच्या आगीत ५६ जणांचा मृत्यु

ढाका : वृत्तसंस्था  – बांगला देशाची राजधानी ढाका येथील रसायनाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ५६ जणांचा होरपळून मृत्यु झाला. गोदामाला लागलेली ही आग पाच रहिवासी इमारतींमध्ये पसरल्याने त्यात अनेकांचा मृत्यु झाला.

हिमस्खलनात १ जवानाचा मृत्यू, ५ जण बेपत्ता 

येथील जुन्या ढाका परिसरात असलेल्या रसायनाच्या गोदामाला बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत केमिकल्स, बॉडी स्प्रे आणि प्लास्टिकची दुकाने जळून खाक झाली. या दुकानांभोवती असलेल्या पाच इमारतींना या आगीने वेढले. त्यामुळे इमारतीमधून बाहेर पडण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक लोक अडकून पडले. त्यातूनच अनेकांचा होरपळून मृत्यु झाला, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशामक दलाचे २०० अधिकारी, कर्मचारी ही आग विझविण्यासाठी झुंजत होते.
अग्निशमन दलाचे प्रमुख अली अहमद यांनी मृतांचा आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती दिली आहे. ५६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शोध सुरु आहे. गॅस सिलेंडरमुळे ही आग लागली असल्याची शक्यता असून इमारतींमध्ये केमिकल्सचा साठा असल्याने आग पसरली असावी. या आगीत मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली आहे.

अशाच प्रकारे जुन्या ढाक्यामध्ये २०१० मध्ये आग लागली होती. केमिकलच्या गोदामाला लागलेल्या आगीत १२० जणांचा मृत्यु झाला होता.