चीनसोबत मोठा करार झाल्यानंतर भारतावर का भडकला बांगलादेश ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने या आठवड्यात बांगलादेशाची 97 टक्के निर्यात टॅरिफ मुक्त करण्याची घोषणा केली. भारतात चीनच्या या निर्णयाला बांगलादेशाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले गेले आणि त्यावर टीका केली गेली. दरम्यान, बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी सोमवारी चीनचा बचाव करत भारतीय माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांबद्दल कठोर टीका केली. त्यांनी सोमवारी सांगितले की, जे भारतीय विश्लेषक चीन आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या द्विपक्षीय कराराला कमी विकसित असलेल्या बांगलादेशसाठी दान असल्याचे म्हणत आहे, हे त्यांची अरुंद मानसिकता दर्शवते.

चीनच्या या कराराबद्दल भारतीय माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातमीवर दोन दिवसांत बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री मोमेन यांची ही दुसरी प्रतिक्रिया आहे. भारतीय माध्यमांतील काही अहवालात म्हटले होते की, लडाखमधील एलएसीवरून भारताशी झालेल्या तणावाच्या काळात चीन बांगलादेशला आपल्या बाजूने ठेवण्यासाठी या कराराचा वापर करीत आहे. यावर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री म्हणाले की, भारतीय माध्यमांच्या काही विभागांकडून येणाऱ्या टिप्पण्या पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. एका वृत्तपत्राशी बोलताना मोमेन म्हणाले की, अशा टिप्पण्यांमुळे पत्रकारितेच्या मूल्यांचा देखील अपमान होतो.

त्याआधी रविवारी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री मोमेन म्हणाले होते की, बांगलादेशला कमी लेखण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. ढाकाने या टिप्पण्या अतिशय गंभीरपणे घेतल्या आहेत आणि सरकार यावर खूप नाराज असल्याचे त्यांनी सूचित केले. दरम्यान, बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले की, देशासाठी ‘खैरात’ या शब्दाचा वापर करण्याबाबत सोशल मीडियावर जोरदार गोंधळ असूनही आपण हा विषय अधिकृत स्तरावर उपस्थित करणार नाही.

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री मोमेन यांनीही भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर प्रतिक्रिया दिली होती. वास्तविक, नागरिकत्व कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील निर्वासितांना वगळण्यात आले आहे. भारतात बांगलादेशाच्या बेकायदेशीर निर्वासितांच्या बातमीवर मोमेन म्हणाले होते की, बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक क्षमता आहे, त्यामुळे स्वत: भारतीय बांगलादेशात घुसखोरी करण्यास उत्सुक आहेत.

बांगलादेश – भारत यांच्यात नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध आहेत, परंतु आता चीन भारताच्या शेजारील प्रत्येक देशात आपला प्रभाव वाढविण्यात गुंतलेला आहे. बांगलादेश आणि चीनमध्ये केवळ व्यावसायिक संबंधच नाही, तर गेल्या काही महिन्यांत दोघांनीही आरोग्य क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवले आहे. सोमवारी, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील उच्चस्तरीय डॉक्टरांचे एक शिष्टमंडळ बांगलादेश सरकारला कोरोना साथीच्या आजाराशी संबंधित मदत करण्यासाठी पोहोचले. ढाका येथील हजरत शहजालाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर चिनी प्रतिनिधीमंडळाचे चांगले स्वागत झाले. फेअरवेल कार्यक्रमात बांगलादेशचे आरोग्यमंत्री जाहिद हुसेन देखील उपस्थित होते. बांगलादेशच्या आरोग्यमंत्र्यांनी चीनला विनंती केली कि, जेव्हा ते कोरोनाची लस बनवतील तेव्हा ते त्यांना प्रथम प्राधान्य देतील.

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 20 मे रोजी दूरध्वनीवर संवाद साधला. चर्चेदरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनला बांगलादेशचा खरा मित्र म्हणून संबोधले. या संवादानंतर व्यापार आणि आरोग्य सुविधांच्या बाबतीत दोन्ही देशांमधील सहकार्य वाढले आहे. भारत आणि चीन यांच्यातील तणावादरम्यान 19 जून रोजी बांगलादेश आणि बीजिंग यांच्यात झालेल्या कराराची घोषणा करण्यात आली होती आणि भारतीय विश्लेषकांनी त्याकडे लक्ष देणे बंधनकारक होते. दरम्यान, या करारासाठी काही चॅनेल्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘खैरात’ हा शब्द वापरला गेला आहे, ज्यावर बांगलादेशींनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.