सिंगापूरमध्ये हिंदूंवर हल्ला करण्याची आणि काश्मीरमध्ये युद्धाची तयारी करणारा बांगलादेशी अटकेत

सिंगापुर : वृत्तसंस्था – सिंगापूरने मंगळवारी म्हटले की, त्यांनी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे, जो देशात हिंदूंच्या विरुद्ध हल्ला करण्याचा कट रचत होता आणि काश्मीरमध्ये लढण्याचीसुद्धा त्याची योजना होती. गृह मंत्रालयाने सांगितले की, फ्रान्समधील हल्ल्यानंतर सुरक्षेच्या उपायांतर्गत 37 संशयित लोकांची चौकशी करण्यात आली होती, ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या बांगलादेशी नागरिकाचे नाव फैसल असून, तो 26 वर्षांचा आहे. त्यास अंतर्गत सुरक्षा कायद्यांतर्गत (आयएसए) अटक केली आहे. दहशतवादाशी संबंधित हालचाली दिसून आल्याने त्याला ताब्यात घेतले होते.

वक्तव्यानुसार, ज्या संशयित 37 लोकांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी 14 सिंगापूरचे नागरिक आणि 23 परदेशी आहेत. परदेशींमध्ये बहुतांश बांगलादेशी आहेत. चॅनेल न्यूज आशियाने गृह मंत्रालयाद्वारे जारी वक्तव्याच्या संदर्भाने वृत्त दिले आहे की, फैसलने एक चाकू खरेदी केला आहे, ज्याच्याबाबत त्याचा दावा आहे की, त्या चाकूद्वारे त्याला बांगलादेशात हिंदूंवर हल्ला करायचा होता आणि काश्मीरमध्ये इस्लामच्या कथित शत्रूंशी लढायचे आहे. मंत्रालयने सांगितले की, अंतर्गत संरक्षण विभागाच्या (आयएसडी) सुरुवातीच्या तपासात समजले की, फैसल कट्टरपंथीय आहे आणि आपल्या धर्माच्या समर्थनासाठी शस्त्राद्वारे त्याला हिंसा करायची आहे.

इस्लामिक स्टेटचे आकर्षण
मिळालेल्या माहितीनुसार, फैसल 2017 पासून सिंगापूरमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. तो 2018 मध्ये आयएसआयएसच्या ऑनलाइन प्रचारातून कट्टरपंथी बनला. त्यास दोन नोव्हेंबरला अटक करण्यात आली. तो सीरियामध्ये इस्लामी शासन स्थापन करण्याच्या आयएसआयएसच्या घोषणेकडे आकर्षित झाला आणि त्याला आयएसआयएससोबत सीरिया सरकारच्या विरुद्ध लढण्यासाठी जायचे होते. त्याचे म्हणणे आहे की, जर त्याचा लढताना मृत्यू झाला तर तो शहीद होईल. 2019 च्या मध्यावर फैसल हयात तहरीर अल शाम (एचटीएस) चा निष्ठावान झाला. सीरियामध्ये खिलाफत कायम करण्यासाठी लढणारी ही आणखी एक दहशतवादी संघटना आहे.

मंत्रालयाने म्हटले, त्याने सीरिया येथील संघटनेसाठी वर्गणीसुद्धा दिली आहे आणि त्याचे म्हणणे आहे की, त्याच्या वर्गणीने सीरियामध्ये एचटीएसला फायदा होईल. वक्तव्यात सांगण्यात आले आहे की, फैसल बनावट नावाने बनवण्यात आलेल्या सोशल अकांउंटवर हिंसा वाढवणारा प्रचार करत होता. आयएसआयएस आणि एचटीएसशिवाय फैसलने अल कायदा, अल शबाबसारख्या दहशतवादी संघटनांसाठीसुद्धा समर्थन व्यक्त केले आहे. परंतु, तो फ्रान्समध्ये झालेल्या घटनांशी संबंधित नाही.

सिंगापूर सरकारने पकडलेल्या संशयित 23 परदेशी नागरिकांपैकी 16 जणांना त्यांच्या देशात परत पाठवले आहे, ज्यामध्ये 15 बांगलादेशी आणि एक मलेशियाई होता. 7 परदेशी नागरिकांची आता चौकशी सुरू आहे.