मराठा समाजाविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या लक्ष्मण मानेंवर भिरकावल्या बांगड्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी मराठा समाजाविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांनी माफी मागावी यासाठी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शासकीय निवासस्थानाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माने यांच्या अंगावर बांगड्या भिरकावण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या गोंधळामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक असल्याने माने हे कसबा बावडा रोडवरील शासकीय निवासस्थात आले होते. यावेळी स्वाभिमानचे सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. त्यांनी माने यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत समस्त मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली. आपण कोणत्याही समाजाच्या विरोधातकक्तव्य केलेले नाही. जरी कोणाला तसे वाटत असेल तर त्यांची माफी मागतो. आजपर्यंत चार ठिकाणी माफी मागितली आहे, असे माने यांनी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना सांगितले; मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बांगड्या फेकल्या.

यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकाने आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांची सुटका केली.