हवेत उडून महिलेवर आदळला रिक्षा चालक, पाहा व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सोशल मीडियावर बंगळुरूमध्ये एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये रिक्षावाला रस्त्यावर असलेल्या वीजेच्या तारेला अडकून दूरवर उभा असलेल्या महिलेच्या अंगावर जाऊन पडला आहे. हा व्हिडीओ पाहून, ही घटना खरच घडली आहे का अशी शंका अनेकांकडून उपस्थित करण्यात आली आहे.

ही घटना कोलार येथील टीसी पायला रोड येथे घडली. व्हिडीओमध्ये एक रिक्षा चालक उभा असताना, बाजूला हवेत तरंगणार्‍या व्हायरवर त्याचा पाय पडतो. पाय पडताच रिक्षा चालक हवेत फेकला गेला, आणि रस्त्यावर चालत असलेल्या महिलेच्या अंगावर जाऊन पडला. या भयंकर अपघातात रिक्षा चालक आणि महिला दोघंही गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना 16 जुलैला घडली असून 42 वर्षीय महिला सुनिता यांच्या डोक्याला मार लागला आहे. सुनिता यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांना तब्बल 52 टाके पडले आहेत. या घटनेनंतर रस्त्यावर पडलेल्या ओव्हरहेड केबल वेळच्या वेळी का नाही काढून टाकल्या जात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ही घटना घडल्यानंतर सामान्य जनताही संतापली आहे. हा मोठा अपघात होऊ शकला असता, मात्र सुनिता यांचा जीव थोडक्यात वाचला.