मोठा दिलासा ! बँकांचा 3 दिवसांचा संप स्थगित

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुकारलेल्या 11 ते 13 मार्च दरम्यान होणारा तीन दिवसांचा संप स्थगित केला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक चर्चा केल्याने संप तूर्तास स्थगित केल्याची घोषणा ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन संघटनेने शनिवारी केली. होळीच्या सणा दरम्यान बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे होणारी ग्राहकांची गैरसोय यामुळे होणार नाही.

बँक कर्मचाऱ्यांचे नऊ संघटनांचे प्रतिनिधी आणि इंडियन बँक असोसिएशनचे प्रमुख राजकिरण राय यांच्यात आज मुंबईत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांबाबत इंडियन बँक असोसिएशने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे 11 मार्चपासून सुरु होणारा हा तीन दिवसांचा संप स्थगित केल्याचे इंडियन बँक असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचेलम यांनी सांगितले.

जानेवारीत झालेल्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय संपानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात तीन दिवसाच्या संपाचा इशादा दिला होता. 11 ते 13 मार्च दरम्यान तीन दिवस संप करण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी मंगळवारी 10 मार्चला होळीची सुट्टी आहे. आठवड्याअखेर दुसरा शनिवार आणि रविवार आल्याने सलग सहा दिवस बँका बंद राहण्याची शक्यता होती. ज्यामुळे ऐन होळीच्या दिवशी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला असता.

यापूर्वी 8 जानेवारीच्या भारत बंदमध्ये बँक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता. परंतु याला केंद्र सरकारने फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा कर्मचारी संघटनांनी 11 ते 13 मार्च असा तीन दिवस संप करण्याचा इशारा दिला होता, परंतु आता हा संप स्थगित केला गेला आहे.