Covid impact : आता बँकांच्या कामकाजाचे तास कमी होणार का ? जाणून घ्या पूर्ण प्लॅन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. देशभरातील अनेक शहरांची स्थिती अतिशय वाईट आहे. अनेक ठिकाणी अंशता लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या दरम्यान आता बँक युनियनने बँक कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी उपाय करण्याची मागणी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. युनियनने म्हटले आहे की, बँकांचे कामाचे तास, वर्किंग डे कमी करावेत आणि शाखांना किमान कर्मचार्‍यांसह काम करण्याची परवानगी देऊन काही प्रभावी उपाय करावेत.

कामकाजाचे तास कमी करण्याचा सल्ला
नऊ युनियनची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (युएफबीयू) ने अर्थसेवा विभागाचे सचिव देवाशीष पांडा यांना एक निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, बँकेच्या शाखा कोरोना संसर्गाच्या हॉटस्पॉट आहेत. अशावेळी लवकरात लवकर सरकारने उपाय करावेत. याशिवाय युनियनने कामकाजाचे तास कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

सामान्य लोकांवर काय होणार परिणाम ?
जर बँक युनियनचे म्हणणे मान्य करण्यात आले तर सामान्य सामान्य लोकांसाठी बँका उघडणे आणि बंद होण्याच्या वेळेत बदल होऊ शकतो. बँक सकाळी 10 वाजता ऐवजी 9:30 वाजता उघडू शकते आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंत ग्राहकांची कामे पूर्ण केली जाऊ शकतात. याबाबत प्रस्तावावर गांभिर्याने विचार केला जात आहे. बँकांची संस्था इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक युनियन्समध्ये पहिल्या टप्प्यातील चर्चा झाली आहे. कर्मचार्‍यांसाठी घरून काम करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.