बँक युनियननं पुन्हा केली संपाची घोषणा ! 27 मार्चनंतर सलग 3 दिवस बँका बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक संघटनांनी पीएसयू बँकांच्या (PSU Banks) मेगा विलीनीकरणाच्या निषेधार्थ ११ मार्चपासून तीन दिवसांचा बँक संप मागे घेतल्यानंतर, आता संघटनांनी २७ मार्च रोजी पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएसयूच्या दहा बँकांना चार मोठ्या बँकांमध्ये विलीन करण्याच्या योजनांना मान्यता दिली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल जाहीर केले. हे विलीनीकरण यावर्षी 1 एप्रिलपासून लागू होईल.

मिळालेल्या माहितीनुसार संघटनांनी असेही म्हटले आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते १ एप्रिलपासून बँकांचा देशव्यापी संप करतील. त्यांच्या मागण्यांमध्ये 10 पीएसयू बॅंकांचे प्रस्तावित विलीनीकरण थांबविणे, आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण, बँकिंग सुधारणांचे रोलबॅक, बेड लोनची वसुली आणि ठेवीवरील व्याज दरात वाढ या गोष्टींचा समावेश आहे.

संपामुळे बँका ३ दिवस बंद राहतील

हा संप झाल्यास या महिन्याच्या शेवटी बँकांना सुटी दिली जाईल. 27 मार्च रोजी संप होईल, २८ मार्चला चौथा शनिवार आहे आणि 29 मार्च रोजी रविवारी असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

या वर्षात 2 वेळा झाला बँकेचा संप

मार्चमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी संप केल्यास, यावर्षी आतापर्यंतचा हा तिसरा बँक संप असेल. यापूर्वी 8 जानेवारी रोजी भारत बंदच्या वेळी बँक संघटनांनी मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात एक दिवसाचा संप पुकारला होता. यानंतर 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी संप झाला.