विविध बँकांमध्ये तब्बल ७१ हजार कोटींचे घोटाळे ; आरबीआयची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांनी गेल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) उच्चांक गाठला. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ६ हजार ८०० प्रकरणे उघडकीस आली आहेत. व्यावसायिक बँका व निवडक वित्तीय संस्थांमध्ये मिळून गेल्या आर्थिक वर्षात ७१ हजार ५४२.९३ कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या घोटाळ्यांत ७३ टक्क्यांनी वाढ झाली अशी माहिती आरबीआयने दिली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका पत्रकाराने माहिती अधिकारांतर्गत या विषयी माहितीची मागणी केली होती.

२०१७-१८ आर्थिक वर्षातील बँक घोटाळे –

२०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांमध्ये ४१ हजार १६७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला होता. त्यावेळी आर्थिक गैरव्यवहारांची ५ हजार ९१६ प्रकरणे समोर आली होती. मागील ११ वर्षांत बँकांच्या आर्थिक घोटाळ्यांची तब्बल ५३ हजार ३३४ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या सर्व प्रकरणांमिळून एकूण २. ०५ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.

माजी सीएमडीसह १५ बँक अधिकाऱ्यांवर कारवाई –

सीबीआयने गेल्या आर्थिक वर्षांत दोन सरकारी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. आयडीबीआय बँकेतील ६०० कोटी रुपयांच्या कर्जघोटाळा प्रकरणात सीबीआयने या बँकेचे माजी सीएमडी सी. शिवशंकरन यांच्यासह १५ अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती.