बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील भाजपच्या ‘या’ बडया नेत्याच्या निवासस्थानावर CBI चा छापा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – केंद्रीय अन्वेषण विभागाने ५७ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने ज्या ठिकाणी छापे टाकले आहेत, त्यातील एक भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मोहित कंबोज यांचे निवासस्थान देखील आहे.

सीबीआयने म्हटले, “एका खासगी कंपनीसह आरोपींच्या निवासी व अधिकृत परिसरात शोध घेण्यात आला आहे. छाप्यांमध्ये मालमत्ता, कर्ज, विविध बँक खाती आणि लॉकरच्या चाव्या यासह संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.”

बँक ऑफ इंडियाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने एफआयआर नोंदवली आहे. ज्यांच्या विरोधात बँकेने तक्रार दाखल केली, त्यांच्यात एव्हियन ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून ती आता मेसर्स बाग्ला ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते.

या तक्रारीत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भाजप नेते मोहित कंबोज, केबीजे हॉटेल्स गोवा प्रायव्हेट लिमिटेड, जितेंद्र गुलशन कपूर, सिद्धांत बागला, इरतेश मिश्रा आणि अज्ञात अधिकाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांवर बँक ऑफ इंडियाची ५७.२६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, २०१३ ते २०१८ या काळात एव्हियन ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज आणि इतरांनी अज्ञात अधिकाऱ्यांसह कट रचला आणि बँक ऑफ इंडियाची फसवणूक केली. कंपनीला परदेशी बिल चर्चेची मर्यादा आणि निर्यात पॅकेजिंग क्रेडिट मर्यादेला मंजूरी दिली गेली होती.

सीबीआयने म्हटले, “या षडयंत्रांतर्गत या खासगी कंपनीला बँकेकडून ६० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली. असा दावा केला जात आहे की, या मंजुरीचा फायदा घेत कंपनीने मंजूर निधी काढून घेतला आणि दावा म्हणून बनावट कागदपत्रे सादर केली. या षडयंत्रामुळे बँक ऑफ इंडियाचे ५७.२६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.”

मोहित कंबोज हे भाजपच्या मुंबई युनिटचे सरचिटणीस आहेत, ज्यांच्याविरोधात सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. कंबोज हे २०१६-१९ या काळात भारतीय जनता पक्षाच्या मुंबई युवा शाखेचे अध्यक्षही होते. ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांची मुंबई भाजपचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली होती.