बनावट कागदपत्रांव्दारे बँकेला सव्वा कोटीचा ‘चुना’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट कागदपत्रांव्दारे सव्वा कोटीचे कर्ज उचलून बँकेला चुना लावणार्‍या एका चौकडीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पाच वर्षांपूर्वीच ही बनवाबनवी बँकेच्या लक्षात आल्यानंतरही तक्रार नोंदवण्यात का उशीर झाला?, ते स्पष्ट न झाल्यामुळे आश्चर्य वजा संशय व्यक्त केला जातोय.

प्रमोद मोतीराम वालमांढरे, शितल प्रमोद वालमांढरे (रा. बालाजी नगर) कृष्णकुमार लक्ष्मणराव देशमुख (रा. शंकर नगर) आणि रोशन होरे (रा. प्रतापनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी प्रमोद वालमांढरे व त्यांची पत्नी शीतल या दोघांनी 2013 मध्ये तत्कालीन कार्पोरेशन बँक आणि सध्याच्या युनियन बँक ऑफ इंडिया किंग्स वे शाखेमध्ये गृह कर्ज मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती कागदपत्रं व निर्मलबाई जोशी यांच्या मालमत्तेची कागदपत्रे सादर केलेली होती.

कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर बँकेने 24 नोव्हेंबर 2013 ला आरोपी प्रमोद व शीतल वालमांढरे या दोघांना एक कोटी, 20 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केलेत. घराचे विक्रीपत्र झाल्यानंतर गृहकर्जाचा डिमांड ड्राफ्ट मूळ भूखंड मालक आरोपी देशमुख यांच्या नावाने तयार करून देण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार शितल प्रमोद व देशमुख या तिघांनी संबंधित घराचे विक्रीपत्र बँकेत जमा केले. त्यानंतर बँकेने एक कोटी, 9 लाख रुपये (डीडी) आरोपी देशमुख याच्या खात्यात जमा केला. तर, 11 लाखाची रक्कम घर दुरुस्तीच्या नावाखाली वालमांढरे दांपत्याला दिले. घर दुरुस्तीसाठी दिलेल्या रकमेपैकी पाच लाख रुपये वालमांढरे दाम्पत्याने आरोपी देशमुखच्या खात्यात हस्तांतरित केले.

दरम्यान, आरोपींना कर्जाची परतफेड दरमहा एक लाख, 20 हजार रुपये अशा स्वरूपात परत करायची होती. ठरल्याप्रमाणे 3 जुलै 2015 पर्यंत आरोपींनी नियमित हप्ते भरलेत. नंतर मात्र, रक्कम भरणे बंद केल्यामुळे 31 जुलै 2015 बँकेने आरोपींना नोटीस पाठविलीय.

प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे बँक व्यवस्थापक आणि कर्मचारी प्रमोद वालमांढरे यांच्या घरी गेले. त्यावेळी बनवाबनवी उघड झालीय. ज्या घराची आरोपींनी विक्रीपत्र करून कर्ज उचलले होते, ते घर निर्मलाबाई जोशी यांचे असून त्यांनी 1988 मध्ये नोंदणीकृत मृत्यूपत्र तयार करून प्रदीप भुसारी नामक नातेवाईकांच्या नावे केले होते. तेथे आरोपी रोशन होरे हा भाड्याने रहात होता.

26 जुलै 1995 ला निर्मलाबाई मृत झाल्यानंतर आरोपी होरे याने बनावट कागदपत्र तयार केले. तसेच ती मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतलीय. त्यामुळे प्रदीप भुसारी यांनी या मालमत्तेच्या ताब्यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली. आरोपी होरेविरुद्ध गुन्हाही दाखल केला. ही पार्श्वभूमी असताना आरोपी वालमांढरे दांपत्य, देशमुख तसेच होरे या चौघांनी बनावट कागदपत्रांव्दारे बँकेत कर्ज प्रकरण सादर करून एक कोटी 20 लाख रुपयांची उचल केलीय, ती रक्कम स्वतः वाटून घेतली.

1995 ला ही बनवाबनवी उघड झाली असताना बँकेने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास 5 वर्षे का लावले?, ते कळायला मार्ग नाही. पोलिसांनी बँक व्यवस्थापक राजेश पांडुरंग गावंडे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. उपरोक्त आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.