Bank Holidays Complete List March 2021 : मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार, उरकून घ्या महत्वाचे व्यवहार, जाणून घ्या यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये बॅंकाचे कामकाज तब्बल 11 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचे बॅंकेचे कुठले काम अडकून पडले असेल तर आधीच करून घ्या, नाहीतर तुम्हाला समस्यांच्या सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच मार्चमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत, याची यादीच तुम्हाला देत आहोत.

देशातील सर्व बँकांना 11 दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांना सुट्टी राहील. यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय 4 रविवार आणि 2 शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच मार्च महिन्यात एकूण 11 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. दरम्यान बॅंकाना 11 दिवस सुट्टी असली तरी IMPS, RTGS आणि NEFT सुविधा 24×7 सुरु राहणार आहेत. देशभरात रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधेसाठी रिझर्व्ह बँकेचे नवे नियम लागू झालेत. त्यानुसार आता ही सुविधा 24×7 उपलब्ध आहे. अशा प्रकारची सुविधा पुरवणारा भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे.

मार्चमध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्या :
5 मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी राहील.
7 मार्च, रविवार
11 मार्च, गुरुवार, महाशिवरात्री
13 मार्च, दुसरा शनिवार
14 मार्च, रविवार
21 मार्च, रविवार
22 मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुट्टी
27 मार्च, चौथा शनिवार
28 मार्च, रविवार, होळी
29 मार्च, सोमवार, धूलिवंदन
30 मार्च, मंगळवार, राजस्थान दिवस