सावधान ! …तर बँक अकाऊंटमधून पैसे होतील गायब, Bank of India नं दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून ऑनलाइन खरेदीवर भर दिला जात आहे. याचा फायदा घेऊन काही भामटे नागरिकांची फसवणूक करत आहेत. कोरोना संकट काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. तसेच ग्राहकांना सोशल इंजिनीअरिंग फ्रॉडपासून सावध केले आहे. या संदर्भात बँकेने ट्विट करुन माहिती दिली आहे.

…तर मोठे नुकसान होऊ शकते

बँक ऑफ इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांनी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तिला देऊ नये. तसेच आपली वैयक्तिक माहिती फोन किंवा सोशल मीडियावर उघड करु नये. जर ग्राहकांनी अशा प्रकारची चूक केली तर त्यांना मोठे नुकसान होऊ शकते. त्यांच्या बँक खात्यामधून पैसे गायब होऊ शकतात. ग्राहकांनी बँकेच्या टोल फ्री नंबरच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करावा. तसेच ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा, असे आवाहन केले आहे. याशिवाय आपली वैयक्तीक माहिती फोन किंवा मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले PIN, CVV, OTP आणि कार्डची माहिती देऊ नये, असे बँकेने सांगितले आहे.

फसवणूक झाल्यावर काय करायचे ?

जर ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर संबंधित ग्राहकाने भारत सरकारच्या http://cybercrime.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करुन तक्रार करावी.

ही माहिती शेअर करु नका

ग्राहकांनी कोणालाही पॅन कार्डची माहिती, आयएनबी प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए सांगू नका. जर तुम्ही ही माहिती एखाद्यासोबत शेअर केली तर तुमचे बँक खात्यातून पैसे गायब होतील.