‘फक्त बँकेची कर्जे अर्थव्यवस्था पूर्वपदावर नाही आणू शकणार, केंद्र सरकारनं ‘हे’ देखील करावं’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊनच्या काळात उद्योग, व्यावसायिकांसोबत छोट्या लघुउद्योजकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे अनेकांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. तर अनेकांना बेरोजगार व्हावे लागले होते. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पंतप्रधानांनी देशाच्या जीडीपीच्या १० टक्के एवढ्या मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. तर देशातील बँकांनी ग्राहकांच्या मागणीनुसार कर्ज देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पुथ्वीराज चव्हाण यांनी देशातील कोलमडलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी वारंवार केंद्र सरकारला पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. चव्हाण यांनी आज ट्विट करुन म्हटलं की, लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. त्यासाठी केवळ कर्ज दिले म्हणून अर्थव्यवस्था सुधारेल असे होऊ शकणार नाही.

लॉकडाऊन मुळे उत्पादन क्षेत्रात गंभीर आर्थिक संकटाचा सामना सुरु आहे. मालक कामगारांचे वेतन देण्यास सक्षम नाहीत. सरकारने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जाहीर करुन प्रोत्साहन द्यावे. मध्यम व लघु उद्योजकांना कामगारांचे पगार थेट देण्यात यावे. केवळ बँकाच्या माध्यमातून देण्यात येणारे कर्ज अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणू शकत नसल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.