पारधी समाजाला मुद्रा कर्ज नाकारल्याने बँक व्यवस्थापकावर गुन्हा

अमरावती – पोलीसनामा ऑनलाईन – पारधी समाजाला मुद्रा कर्ज नाकारल्याप्रकरणी अमरावतीतील बियाणी चौकातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेतील कर्ज प्रकरणाच्या व्यवस्थापकाविरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

अनिल अंतुराव चव्हाण (२६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यवस्थापक पंकज चिखेल यांच्याविरोधात अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी चव्हाण यांनी ४ फेब्रुवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बियाणी चौकातील शाखेत मुद्रा कर्ज योजनेचा अर्ज मागितला. त्यावेळी व्यवस्थापक चिखले यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पारधी समाज रस्त्यावर फिरतो. तुम्हाला सगळे फुकट पाहिजे, मी तुम्हाला योजनेचा लाभ देऊ शकत नाही असे म्हणाले. त्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून चव्हाण यांना व त्यांच्या सोबतच्या व्यक्तींना बाहेर काढत जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. असे फिर्यादीत म्हटले आहे.