टॅंकरच्या धडकेत बॅंक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव टॅंकरच्या धडकेत बुलेटस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉलसमोर घडली. ठार झालेली व्यक्ती ही पुण्यातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीस आहे.

नवीन चंद्रा भावीकडी (वय ३१, रा. सांगवी, मुळ हैद्राबाद) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शकील सैय्यद इटगी (वय ३५, रा. धायरी फाटा) या टॅंकर चालकावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सागर कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चंद्राबी हे पुण्यातील बाजीराव रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नोकरीस होते. दरम्यान सोमवारी ते धायरी येथून स्वारगेटकडे जात होते. त्यावेळी अभिरुची मॉलसमोर आल्यावर एमएसईबी कार्यालयासमोर त्यांच्या बाजूने एक टॅंकर जात होते. त्यावेळी टॅंकर चुकीच्या पद्धतीने जात असल्याने त्याचा धक्का लागून ते खाली पडले आणि टॅंकरच्या मागील चाकाखाली ते आले. याघटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्यावेळी सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चंद्राबी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पुढील तपास सिंहगड पोलीस करित आहेत.