कामाची गोष्ट ! 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान बँका बंद ? 4 संघटना संपावर, दैनंदिन कामकाजावर परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या बँक विलीनीकरणाच्या निर्णयाच्या निषेधार्थ चार बँक संघटनांनी 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून बेमुदत संप पुकारण्यात येईल असेही या संघटनांनी जाहीर केले आहे. नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 10 सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती.

विलीनीकरणाच्या या निर्णयानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या सध्याच्या 27 वरून 12 करण्यात येईल. बँकांच्या विलीनीकरणामुळे खातेदारांवरही परिणाम होणार आहे. यापूर्वी 6 छोट्या सरकारी बँकांचा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आणि विजया बँक, देना बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले आहे. एसबीआय आणि बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरणानंतर 10 सार्वजनिक बँका आधीच दोन मोठ्या बँकांमध्ये रुपांतरित झाल्या आहेत.

तर बँक कर्मचारी जाणार अनिश्चित संपावर
बँक विलीनीकरणाच्या निर्णयाचा बँक कर्मचारी देशभर शांततेत निषेध करत होते. आता या निर्णयाला आता तीव्र विरोध दर्शविण्यासाठी चार कामगार संघटनांनी संप जाहीर केला आहे. त्याचबरोबर, या मागण्या मान्य न झाल्यास नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून अनिश्चित संपावर जाण्याची धमकी दिली आहे. यापूर्वी 31 रोजी बँक कर्मचारी संघटना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियनच्या सदस्यांनी आपापल्या बँकांमध्ये काळ्या पट्ट्या बांधून काम करताना निदर्शने केली होती.

बँक संघटनांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने चुकीच्या वेळी हा निर्णय घेतला आहे आणि त्याचा आढावा घेण्याची गरज आहे. विलीनीकरण म्हणजे अशा सहा बँका बंद करणे ज्यांना तयार होण्यास बरीच वर्षे लागली आहेत. संपावर जाण्याविषयी बँक संघटनांची दिल्लीत बैठक होणार आहे.

कामकाजावर होऊ शकतो परिणाम
जर कर्मचारी संपावर गेले तर बँकांच्या कामकाजावर परिणाम होईल. त्यामुळे ग्राहकांनी या संपाच्या अनुषंगाने आपली कामे उरकून घ्यावीत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like