बँक कर्मचार्‍यांचे आंदोलन चिघळणार, सरकार नमले नाही तर शेतकर्‍यांसारखे मोठे आंदोलन करणार : युनियनचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात आज सार्वजनिक बँकांच्या संपाचा दुसरा दिवस आहे. या कारणामुळे बँकांमध्ये रोख रक्कम काढणे, जमा, चेकर क्लियरिंग आणि इतर व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान, संप करणार्‍या युनियनने इशारा दिला आहे की, जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर शेतकरी आंदोलनासारखे मोठे आंदोलन आणि बेमुदत संप पुकारला जाईल.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (युएफबीयू) ने या संपाचे आवाहन केले होते. हे 9 सार्वजनिक बँकांच्या युनियनचे संयुक्त व्यासपीठ आहे. हा संप 15 मार्चला म्हणजे सोमवारी सुरू झाला आणि आज याचा शेवटचा दिवस आहे.

का होत आहे संप

खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे लाखो कर्मचारी देशभरात संपावर आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये आयडीबीआय बँकेशिवाय आणखी दोन बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. ज्याचा बँक कर्मचारी युनियनकडून सातत्याने विरोध केला जात आहे. सरकारने आयडीबीआय बँकेचे सर्वप्रथम खासगीकरण केले आहे.

काय म्हटले युनियनने

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए) चे महासचिव सौम्य दत्ता यांनी म्हटले की, सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होणार आहे. केवळ काही प्रमुख अधिकारी वगळता बँकांच्या सर्व अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी या संपात भाग घेतला आहे. यामुळे बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.