खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा 15, 16 फेब्रुवारीला संप, 3 दिवस बँका बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पुढील आठवड्यात दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे पुढील आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकांचे खाजगीकरण करण्याच्या निर्णया विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. पुढील आठवड्यात 15 आणि 16 या दोन दिवस बँका बंद राहणार आहे. त्यातच 14 तारखेला रविवार असल्याने या दिवशी बँकेला अधिकृत सुट्टी असते. त्यामुळे बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांचे तसेच बँकांचे खाजगीकरण करण्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना दिले होते. यापार्श्वभूमीवर संभाव्य खाजगीकरणाला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) मंगळवारी (दि.9) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. युएफबीयुमध्ये सामील असलेल्या बँका संघटनांमध्ये एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनबीओडब्ल्यू या नऊ बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा समावेश आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेचे खासगीकरण केले जाणार असल्याचे नुकतेच केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एलआयसीच्या समभागांची विक्री केली जाणार असून विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.