शेवटच्या आठवड्यात बँका चार दिवस बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँकांचे कामकाज चार दिवस बंद राहाणार आहे. बँक कर्मचारी संघटनेने २६ डिसेंबरला बंदची हाक दिल्याने नेहमीच्या सुट्यांमध्ये भर पडली आहे. या कालावधीत बँकांनी एटीएममध्ये पुरेशा चलनसाठ्याची तरतूद न केल्यास नागरिकांना काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे.

चौथा शनिवार व रविवार असल्यामुळे २२ व २३ डिसेंबरला बँका बंद असणार आहेत. त्यानंतर २४ डिसेंबरला बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. २५ डिसेंबरला नाताळनिमित्त सर्वत्र सार्वजनिक सुटी असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. नाताळलाच जोडून म्हणजे २६ तारखेला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या बँक कर्मचारी संघटनेने संप पूकारल्याने त्या दिवशी बहुतांश बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या बँकांच्या एकत्रीकरणाच्या निषेधार्थ बँक कर्मचारी संघटनांनी संप पूकारला आहे. या संपामुळे सलग चार दिवस बँका बद राहणार आहेत. यासाठी एटीएममध्ये पुरेसा चलनसाठा उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांना बसणारी झळ कमी होऊ शकणार आहे.