EMI टाळण्यासाठी OTP शेअर करण्याची अजिबात नाही गरज, SBI नं ग्राहकांना होणार्‍या फसवणूकीपासून केलं सावधान

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना एक सूचना जारी केली आहे. ज्यात बँकेने आपल्या ग्राहकांना नवीन प्रकारच्या सायबर क्राइमबद्दल इशारा दिला आहे. बँकेने म्हटले की, काही घोटाळ्यांमध्ये ग्राहकांना त्यांचे ईएमआय टाळण्यासाठी त्यांच्या कॉलवर ओटीपी मागितले गेले आहे. एसबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ईएमआय टाळण्यासाठी ओटीपी सामायिक करण्याची गरज नाही. कृपया तुमचा ओटीपी सामायिक करू नका. ईएमआय टाळण्याच्या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. ‘

सायबर क्राईम करणारे लोक फसवणूक करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. या लोकांपासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नेहमी सतर्क आणि जागरूक राहणे. बँकेने म्हटले आहे की, जर ग्राहकांनी फसवणूक करणाऱ्यांना ओटीपी शेअर केला तर ते लोक ताबडतोब ग्राहकाचे पैसे काढून घेऊ शकतो. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान कर्जदारांची आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्जदारांसाठी ईएमआय पुढे ढकलण्याची ऑफर दिली होती. ज्या अंतर्गत ग्राहक तीन महिन्यांचे मासिक देयक पुढे ढकलू शकतो.

एसबीआयने ग्राहकांना माहिती दिली होती की जर त्यांना ईएमआय पुढे ढकलण्याची इच्छा नसेल तर त्यांना त्यांच्या स्तरावर काहीही करण्याची गरज नाही. त्याच वेळी, ज्या ग्राहकांना ईएमआय पुढे ढकलण्याची इच्छा आहे त्यांनी ई-मेलद्वारे बँकेत अर्ज सादर करावा लागेल. दरम्यान, ज्या कालावधीत ईएमआय पुढे ढकलला जाईल त्या कालावधीत मूळ रकमेवर व्याज आकारले जाईल.