बँकांमधील आर्थिक घोटाळ्यांचा ‘आलेख’ उंचावतोय

गेल्या ११ आर्थिक वर्षांत ५३ हजार ३३४ प्रकरणांची नोंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकांमधील आर्थिक घोटाळ्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असताना गेल्या ११ आर्थिक वर्षांचा आढावा घेतला तर आर्थिक घोटाळ्यांची सुमारे ५३ हजार ३३४ प्रकरणांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यांची एकूण व्याप्ती २.०५ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड आहे.

देशभरातील बँकांमध्ये होणा-या आर्थिक घोटाळ्यांनी गेल्या आर्थिक वर्षात ‘उच्चांक’ नोंदवला आहे. २०१८-१९ मध्ये विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या ६ हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली व या घोटाळ्यांचा आकडा तब्बल ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला, अशी धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या घोटाळ्यांत ७३.६८ टक्क्यांनी वाढ झाली, असेही आरबीआयने म्हटले आहे. त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ५,९१६ घोटाळ्यांची प्रकरणे झाली. त्यामध्ये एकूण ४१ हजार १६७.०३ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. गेल्या ११ आर्थिक वर्षांचा विचार केल्यास या कालावधीमध्ये बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या तब्बल ५३ हजार ३३४ प्रकरणांची नोंद झाली आहे.