शुक्रवार सोडून 5 दिवस बँका बंद राहणार; महत्त्वाची कामे आजच करून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयडीबीआय (IDBI Bank) सह आणखी दोन सहकारी बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. खासगीकरणाच्या सरकारच्या निर्णयाला कर्मचारी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे या संघटनांनी पुढील आठवड्यात सलग दोन दिवस संप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्यापासून केवळ एकच दिवस बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे.
जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या संपाच्या घोषणेमुळे बँका उद्यापासून केवळ एकच दिवस सुरू राहणार आहेत. जर तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर करून घ्या. आज आणि शुक्रवारी बँका सुरू राहणार आहेत. खासगीकरणाविरोधात सरकारी बँकांचे कर्मचारी 15 आणि 16 मार्च रोजी संपावर जाणार आहेत. 9 बँक युनियनची केंद्रीय संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने या संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम सरकारी बँकांच्या कामकाजावर होणार आहे.

देशातील सर्वांत मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया यावर देखील या संपाचा मोठा परिणाम होणार आहे. बँकेनेदेखील स्टॉक एक्स्चेंजला याची माहिती दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता एसबीआयने वर्तवली आहे. खासगीकरणाविरोधात पुकारलेल्या
संपाचा परिणाम बँक ग्राहकांवरदेखील होणार आहे.

15 मार्चला सोमवार आणि 16 मार्चला मंगळवार आहे. आठवड्याच्या पहिल्या दोन दिवशी संप होत असल्याने अनेकांची कामे खोळंबणार आहेत. दरम्यान, 11 मार्चला म्हणजेच उद्या (गुरुवार) महाशिवरात्र असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे बँका बंद राहणार आहेत. 12 मार्चला बँका पुन्हा सुरू होतील. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शुक्रवारी बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येऊ शकतो. कारण कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांची बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. 13 मार्चला दुसरा शनिवार आहे. त्यामुळे बँका बंद राहणार आहेत, तर 14 मार्चला रविवार आहे.

जर बँकेची काही महत्त्वाची कामे असतील तर ती 11 मार्च आधीच म्हणजे आजच (बुधवार) संपवा. नाहीतर 11 मार्च ते 16 मार्च या सहा दिवसांच्या कालावधीत केवळ एकच दिवस बँका सुरू राहणार आहेत. त्यामुळे तुमचे काम एक आठवडा लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. खासगीकरण ग्राहकांना सुरक्षा देऊ शकत नाही, असा आरोप बँक कर्मचारी संघटनांनी केला आहे.